परभणी, (प्रतिनिधी)– सेवा संकल्प अभियानांतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव (ता. सोनपेठ) यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा, वडगाव येथे ध्यान व योग शिबिर उत्साहात पार पडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव केला. नियमित योग आणि ध्यानामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मनाची एकाग्रता, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी वाढण्यास मदत होते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी रुजविणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
**


