परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी (दि.11) राज्यस्तरीय परभणी मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून परभणी मॅराथॉन स्पर्धेनिमित्त जय्यत सुरू असून या स्पर्धे साठी तयारी सैराट फेम सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची यांची उपस्थिती असणार माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
या स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 6 वाजता नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, अॅड. अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय धावपटु ज्योती गवते, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूसह जवळपास 1000 खेळाडू सहभागी होणार आहेत. 3, 6 व 10 कि.मी. अंतराच्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या विजयी खेळाडुंना एकुण दोन लक्ष रुपयाची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. शहरातील विविध रस्त्यावरुन हे स्पर्धक धावणार आहेत, असे ते म्हणाले.
स्पर्धा संपताच बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी खा. संजय उर्फ बंडु जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहुल पाटील, माजी आ.विजय भांबळे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, बाळासाहेब देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितीत राहाणार आहे.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजुळ, प्रा. डॉ. गुरुदास लोकरे व रणजित काकडे यांच्या नियंत्रणाखाली 100 तज्ञ पंचाची नियुक्ती या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. रोख पारितोषिकाच्या व्यतिरिक्त प्रत्येक गटातील पहिल्या 10 क्रमांकांच्या खेळाडुंना कीट बंग व मेडल देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धेकांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जातील, अशी माहिती हत्तीअंबीरे यांनी दिली.
वसमत रस्त्यावरील राज गोपालाचारी उद्यानासमोरील संपर्क कार्यालयात 10 ऑक्टोंबर पर्यंत सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत खेळाडुंना आपली नाव नोदणी करता येईल. या मॅराथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक डॉ. हत्तीअंबीरे यांनी केले आहे. दरम्यान, यावेळी परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कैलास टेहरे हे उपस्थित होते.