परभणी ( प्रतिनिधी) आधुनिकतेच्या जमान्यात टपालाचे पत्र कालबाह्य होवू लागले आहे. पूर्वी खुशाली कळवायची म्हटलं की, पत्रा शिवाय पर्याय नव्हता. आता मात्र काळ बदलला आणि सोशल मीडियाचा जमाना आला. त्यामुळे पोस्टाच्या पत्रातील सप्रेम नमस्कार, विनंती विशेष हा नव्या पिढीला अपवादानेच माहिती आहे. मात्र खऱ्या अर्थाने मामाचे पत्र मात्र हरवलं. पण असले तरी बदलत्या जमान्यात बदलाचे आव्हान टपाल विभागाने स्वीकारुन अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत.
गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची टपाल हीच आपल्या संपर्काचे आणि संवादाचे प्रमुख माध्यम होते.
पत्र लिहिण्यास कारण की…या सुरुवातीच्या वाक्याने सुरूवात व्हायची अन संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळवायची. पोस्टमन आल्यास त्याच्यामागे पळत पळत जाऊन विचारायचं आमचं पत्र आलं का? असा प्रश्न विचारायचा. त्या 15 पैशाच्या पत्रातून खूप आनंद मिळत होता. मात्र मोबाईलच्या युगात आता ही पत्रे इतिहास जमा झाली आहेत.
एखादे पत्र आले की घरातील मंडळी समजून जायची की आनंदाची बातमी आहे. मात्र गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पत्राचा वापर कमी झाला आहे. आज पत्राची जागा ई मेल, सोशल मीडियाने घेतली आहे. आपल्या घरातील व्यक्ती नोकरीनिमित्ताने कुटुंबापासून दूर असले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कुटुंबाशी संवाद साधत आहेत.
मात्र प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर उपलब्ध असली तरी आजही महत्वाची कागदपत्रे, पोहोचवण्याचे काम पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून पार पाडले जात आहे. नागरिकांकडून पोस्टाच्या सेवेला मोठ्या विश्वासाने पसंती दिली जात आहे. आपल्या सेवेतून लोकांचा विश्वास संपादन करणार्या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर दिवस, हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जात आहे.आज पोस्ट खाते आधुनिकतेची कास पकडून आहे. पोस्टल बँक, आरडी, असो किंवा पासपोर्ट काढणे असो, पोस्ट खाते खंबीरपणे उपक्रम राबवत आहे. बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 जागतिक टपाल दिन.या निमित्ताने सोशल मीडियाच्या आणि अत्याधुनिक बँक प्रणाली व इतर बाबत ही पोस्ट खाते भक्कमपणे उभे आहे ते ही नव्या स्वरूपात. जागतिक पोस्ट दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेले छायाचित्र
(छाया उत्तम बोरसुरीकर)