परभणी,(प्रतिनिधी) : कुल जमाती तंजीम या संघटनेस 11 ऑक्टोंबर रोजी आयोजित धरणे आंदोलन नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यास भाग पाडावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या संतप्त पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि.10) जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
मागील दोन महिन्यांपासून पुजनीय संत रामगिरी महाराज तसेच पुजनीय नरसिंहनंद महाराज यांना हेतुतः टार्गेट केले जात आहे. विशेषतः परभणीतही या संघटनेने हिंदुसाठीच्या पवित्र नवरात्रीच्या सणात जाणीवपूर्वक धरणे आंदोलन पुकारले आहे. हिंदु माता भगिणी, युवक, अबालवृध्द हे आनंदोत्सव साजरा करत असतांना हिंदुंच्या या सणास आंदोलनाद्वारे हा गालबोट लावण्याचाच एक प्रकार आहे, असे विश्व हिंदु परिषदेच्या या शिष्टमंडळाने नमूद केले. गुरुवारी सकाळी न्यू भारत मटण शॉप या चिकन विक्रेत्याने जाणीवपूर्वक बकरे कापून रस्त्यावर रक्त टाकले. वास्तविकतः या रस्त्यावरुन हिंदु माता-भगिणी अनवानी देवीच्या दर्शनास जात असतांना हा प्रकार हेतुतः करण्यात आला आहे. त्यामुळे अशा या गुंड प्रवृत्तीच्या आणि विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर भावना दुखावल्याबद्दल गुन्हे दाखल करीत कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
या शिष्टमंडळात डॉ. केदार खटींग, अनंत पांडे, मनोजकुमार काबरा, कमलकिशोर अग्रवाल, संजय रिझवानी, प्रल्हाद कानडे, विजय गायकवाड, सतीश घुगे, दिनेश नरवाडकर, अभिजित अष्टूरकर, प्रशांत कायंदे, राजेश देशमुख, नागसेन पुंडगे, अॅड. अमोल देशमुख, राजेंद्र मानकेश्वर, पुरुषोत्तम जोशी, शिवप्रसाद कोरे, सुनील रामपुरकर, सौ. रेणुका मोगरकर, डॉ. सौ. जयश्री कालानी, सौ. अनिता कुलकर्णी, सौ. सुनीता तालखेडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.