परभणी(प्रतिनिधी) : दिवसा ढवळ्या घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली. जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल यावेळी त्यांच्या कडून जप्त करण्यात आला.
मागील काही महिन्यांमध्ये या जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडू लागले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांना सूचना देवून हे गुन्हे उघडकीस आणण्या संदर्भात आदेश बजावले होते. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विविध गुन्ह्यांसंदर्भात टोळीचा मागोवा घ्यावयाचा प्रयत्न केला तेव्हा, बीड जिल्ह्यातील कासारी (ता.आष्टी) येथील दिनेश भोसले नामक आरोपीने एका सहकार्यासह परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती कळाली. त्या आधारे या पथकाने 8 ऑक्टोंबर रोजी आरोपी दिनेश भोसले यास ताब्यात घेतले. तेव्हा त्याने त्याच्या सहकार्यासह परभणी जिल्ह्यात बारा घरफोडी केल्याचे नमूद केले.
पोलिसांनी त्याआधारे त्या घरफोडीतील माल, सोन्या चांदीचे दागिणे जप्त करण्याची कारवाई सुरु केली. एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान या प्रकरणात ताडकळस, नवामोंढा, दैठणा, गंगाखेड, पूर्णा, पालम, चुडावा, मानवत आदी पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी साथीदारांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली होती.
या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मुत्तेपोड, गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गोपिनाथ वाघमारे, काठेवाड, अजित बिरादार, चंदनसिंह परदेशी, कर्मचारी विलास सातपुते, रवि जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, हुसेन, राहुल परसोडे, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, मधुकर ढवळे, निलेश परसोडे, हनुमान ढगे, राम पौळ, नामदेव डुबे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, शेख रफियोद्दीन, हनवते, संजय घुगे, गणेश कौटकर यांच्यासह ताडकळस व मानवतच्या पोलिस कर्मचार्यांनी तपासासाठी सहकार्य केले.