परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत तथा शिवसेनाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी सोमवारी (दि.28) रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेनामहायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरोसे यांनी रविवारी मध्यरात्री परभणीत दाखल होताच सोमवारी सकाळी मोठ्या रॅली च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील शनिवार बाजारातून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी एका उघड्या जीपवर भरोसे यांच्यासह शिवसेनेचे नेते माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,नेते प्रविण देशमुख, महानगरप्रमुख नितेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, केशवराव कदम, माजी जिल्हाध्यक्ष राजू कापसे, महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी, माजी नगरसेवक शिवाजीराव भरोसे, कृष्णा भरोसे, राजू शिंदे,पंजाबराव देशमुख,सुरेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकरराव भागवत,भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे,भीमराव वायवळ,एन डी देशमुख, यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ कॉर्नर मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. यावेळी रॅलीतील उत्साही कार्यकर्त्यांनी बॅन्डच्या तालावर जोरदार नृत्य केले. तर ठिकठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली. या रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील आंदोलन मैदानावर आयोजित केलेल्या सभेत शिवसेनेच्या अन्य वक्त्यांची जोरदार भाषणे झाली. कोणत्याही स्थितीत जागा निवडून आणू, असा विश्वास शिवसेनेच्या नेतेमंडळींनी व्यक्त केला.