परभणी ( प्रतिनिधी) धन्वंतरी जयंती व आयुर्वेद दिनानिमित्त एल आर फार्मास्युटिकल्स परभणी द्वारे आयोजित “ सर्वांसाठी आयुर्वेद” या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्र एल आर फार्मास्युटिकल्सच्या श्री मुकुंद कुलकर्णी सभागृहात दिनांक 26/10/2004 रोजी पार पडले.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारचे ताण तणाव वाढत आहेत अशावेळी संपूर्ण सुरक्षित औषधींचा वापर मानव आरोग्या करिता अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आपला भारत देश हा आयुर्वेदाचा जनक आहे याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला समजले आहे असे विचार मानव आयुर्वेदावर मार्गदर्शन करीत असताना डॉ. कुणाल कौसडीकर यांनी मांडले. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो परंतु या वनस्पतींवरच येणारे आजार, रोग किंवा असे रोग येऊच नयेत म्हणून प्राचीन काळापासून यावर उपाय केले जातात. सुरपाल ऋषींनी लिहिलेले ” वृक्षायुर्वेद” वनस्पतीच्या आजारात वापरला जाणारा आयुर्वेद. घरात, अंगणात, शेतात पेरणी करत असताना ‘ बीजावर’ अनेक रसायनांचा वापर केला जातो, यावर वृक्ष आयुर्वेदामध्ये प्राचीन संदर्भ आढळतात. ‘बी’ पेरणी करण्यापूर्वी विडंग वनस्पतीचा लेप त्यावर लावल्यास जमिनीतील कीटक ते ‘बी’ खात नाहीत व शेतीमालाचे उत्पादन वाढते.
यासारख्याच वृक्ष आयुर्वेदामधील अनेक पद्धतींचे पालन केल्यास खऱ्या अर्थाने कुठलेही घातक अंश विरहित, सुरक्षित शेतीमालाची निर्मिती आपण करू शकतो यावर डॉ. रत्नाकर लोंढे यांनी आपले विचार मांडले.आयुर्वेद हा मानव, वृक्ष याच प्रमाणे पशूंच्या आजारात देखील अत्यंत उपयुक्त आहे. अगदी प्राचीन काळापासून पशूंच्या आजारात वापरल्या जाणारा म्हणून “ पशु आयुर्वेद” या शाखेमध्ये याचा संदर्भ आढळतो.
आजच्या वैज्ञानिक युगात प्रत्येक बाब ही प्रयोगांती सिद्ध असावी लागते व याच नियमानुसार प्राचीन काळापासून सिद्ध असलेला आयुर्वेद आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कसोटीवर सिद्ध असणे, त्याची आपल्याकडे वैज्ञानिक पुरावे असणे हे या शास्त्राच्या विस्तार आणि प्रसारासाठी आवश्यक आहेत. पशुआयुर्वेदामध्ये हत्ती, घोडा, गाय यासारख्या पशुंवर उपचाराचे दाखले आहेत. प्राचीन काळामध्ये हत्ती व घोडा हे प्राणी युद्धात वापरले जातात तर गाय ही श्रीमंती / प्रतिष्ठेचे लक्षण होती यामुळे या पशुंवर उपचार करणारे वैद्य यांना ‘राजाश्रय’ मिळत असे. अशा प्राचीन आयुर्वेदात ‘ सूक्ष्म औषधी’ म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी द्वारे औषध निर्मितीचे संदर्भ आहेत असे पशु आयुर्वेदावरील अभ्यासक डॉ. सुधीर राजुरकर यांनी आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एल आर फार्मास्युटिकल्सचे डॉ. सौरभ राजूरकर यांनी केले.
अशा प्रकारच्या चर्चा सत्रांचे नियमित आयोजन करून वैद्यक व पशुवैद्यक शास्त्रातील संशोधनाचा अभ्यास व चर्चा द्वारे आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा प्रयत्न एल आर फार्मास्युटिकल्स तर्फे केला जाईल असे विपणन प्रमुख सिद्धांत राजूरकर यांनी सांगितले.