परभणी (प्रतिनिधी) ग्रामीण भागात गाई म्हशींसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा देणाऱ्या तज्ञांची उणीव भासत असल्याकारणाने अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या तज्ञांचा अनुशेष दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ,नागपूर आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन टेक्निशियन अर्थात मैत्री संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे तीन महिन्याच्या मैत्री प्रशिक्षणाचे समारोह आज दिनांक 6.11. 2024 रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुधीर राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रशिक्षणासाठी 60 सुशिक्षित बेरोजगार तरुणांची निवड पशुसंवर्धन विभागामार्फत सुचविण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशिक्षण समन्वयक डॉ. मंजुषा पाटील यांनी केले आणि प्रशिक्षणा दरम्यान पशु मधील कृत्रिम देताना संदर्भात जास्तीत जास्त तांत्रिक माहिती दिलेली असून त्याचा उपयोग प्रक्षेत्रावर जातिवंत जनावरांचे संवर्धन करण्यासाठी करावा असे आवाहन केले. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील पशूंच्या कृत्रिम रेतनामध्ये वाढ होऊन आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते असे मत प्रमुख पाहुण्यांनी डॉ. अनिल भिकाने यांनी व्यक्त केले. सदर प्रशिक्षणानंतरही प्रशिक्षणार्थींना महाविद्यालयाकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत राहील याची ग्वाही डॉ. सुधीर राजुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली . डॉ. अमोल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक डॉ. मंजुषा पाटील, प्रकल्प सह समन्वयक अभिनय सावळे, प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ.संदीप रिंढे हजर होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.



