परभणी/प्रतिनिधी शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवून आणण्याचे काम आम्ही केले. त्याची शान वाढविण्याचे काम आता करायचे आहे. परभणीच्या स्थानिक आमदाराने जनतेचा भ्रमनिरास केला असून काहीही काम करायचे नाही, दमडीचे काम करायचे आणि त्याचे श्रेय लाटण्यासाठीच पुढे यायचे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे परभणीला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासाची पर्वणी साधा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या जनतेला केले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे परभणी मतदारसंघातील उमेदवार आनंद भरोसे, जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह विजय वरपूडकर, माजी आ.हरिभाऊ लहाने, प्रताप देशमुख, राजू कापसे, बाळासाहेब जाधव, व्यंकटराव शिंदे, माणिक पोंढे, धम्मदीप रोडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारने सुरू केलेल्या केलेल्या लाडकी बहीण योजनेसह तरुण वर्ग आणि शेतकर्यांंसाठीच्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. लाडकी बहीणसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल आम्हाला विचारणार्या महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरून आपला वचननामा बनवत महिलांना प्रतिमाह 3 हजार रूपये देण्याचे जाहीर केले आहे, मग त्यासाठी पैसा कुठून आणणार? असा सवाल करत, आम्ही तर योजनेचे 5 हप्ते वाटप करून दाखवलेसुध्दा, मात्र अशा प्रकारे कॉपी करून कुणीही पास होऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणार्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा महाविकास आघाडीवाले देत आहेत. हिंमत असेल, तर या सर्व कल्याणकारी योजनांची खुशाल चौकशी करावी. लाडक्या बहीण-भावांसाठी तसेच शेतकर्यांसाठी आपण एकदा नव्हे, शंभरवेळा तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असे सांगत श्री.शिंदे यांनी विरोधकांनाच आव्हान दिले.

महायुती सरकारने शेतकर्यांच्या वीज बिल माफी, पाठोपाठ आता 10 कलमी कार्यक्रमात कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला 2100 रूपये जमा केले जाणार आहेत. विरोधकांनी आमच्या कल्याणकारी योजनांबद्दल अपप्रचार चालवला. लवकर लवकर खात्यात जमा झालेले पैसे काढा नाहीतर सरकार काढून घेईल, असाही खोटा प्रचार केला. परंतू आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. कोणी कोर्टात जाऊ दे, कोणी कुठेही गेले तरी ही योजना बंद होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि पैशांच्या राशीत लोळणार्यांना काय समजणार दीड हजाराची किंमत? असा सवाल करत त्याची किंमत केवळ लाडक्या बहिणींनाच कळते, असे ते म्हणाले. सुत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले.


