परभणी,( प्रतिनिधी) : जागतिक एड्स दिन व कार्तिक अमावस्या निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.03) श्री क्षेत्र त्रिधारा येथे मोफत आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 2 हजार 780 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणी विभाग संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, देवगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गबाळे, अवयवदान जनजागृती विषयात काम करणारे विनोद डावरे, शहर अध्यक्ष प्रा. डॉ. गिरीष कौसडीकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रावणी आवरगंड, शहर मंत्री यश घाटूळ व शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर हे उपस्थित होते.
शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पथक तसेच शहरातील नामवंत डॉक्टरांनी भाविकांची तपासणी केली. विनोद डावरे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले. तसेच लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून देखील अवयदानासंदर्भात जनजागृती केली. डॉ. श्रावणी आवरगंड यांनी अभाविप व मेडीव्हिजन या आयामाची माहिती दिली.


