पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील रामपूर तांडा येथील महिला सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतचा शासकीय निधीचा अपहार करून वसूलपात्र रक्कम नोटीस देऊनसुद्धा भरणा केली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी महिला सरपंचावर पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाआहे. यामध्ये चार लाख १३ हजार १६३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे नमूद केले आहे.
पालम पंचायत समितीचे – गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे यांनी पालम ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२१ ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान तालुक्यातील मौजे रामापूर तांडा ग्रामपंचायतच्या निधीबाबत घडला आहे.
सरपंच म्हणून सुबाबाई थावरू राठोड यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायतचा शासकीय निधीचा अपहार करूनसदरील वसूलपात्र रक्कम चार लाख १३ हजार ५६३ रुपये नोटीस देऊनसुद्धा अद्यापपर्यंत भरणा केले नाहीत. यामध्ये वेळोवेळी नोटीस देऊनसुद्धा ही रक्कम न भरता शासनाची फसवणूक केली. त्यावरून गटविकास अधिकारी शिसोदे यांनी ही फिर्याद दिली.पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या आदेशाने कलम ४०९, ४२० भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक देवगरे करीत आहेत.


