परभणी,(प्रतिनिधी) : ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्ग आठवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायंटिस्ट आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच विज्ञानातील काही पायाभूत संकल्पनांचे आकलन होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. सायंटिस्ट आपल्या भेटीला हा त्यातीलच एक उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शास्त्रज्ञ तथा अहमदाबाद येथील अंकुर हॉबी सेंटरचे संचालक धनंजय रावल तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या सचिव प्रा. सौ. शीतल सोनटक्के, विजय नरवाडे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिक सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांची उपस्थिती होती.
धनंजय रावल यांनी विद्यार्थ्यांना निरीक्षणातून विज्ञान कसे शिकले पाहिजे. तसेच ऍस्ट्रॉनॉमी या शाखेचे व यातील विविध संकल्पनांचे सखोल मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे व दाखले दिले. विविध छोट्या-छोट्या प्रयोगातून व ऍक्टिव्हिटी मधून मुलांच्या अनेक बेसिक संकल्पना स्पष्ट केल्या. या कार्यक्रमांमध्ये घेण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सोबतच अतिशय चांगला प्रतिसाद दिला. हसत-खेळत, सहज साध्या साध्या गोष्टी मधून आपण कसे विज्ञान शिकू शकतो याचे अनेक दैनंदिन जीवनातील उदाहरणे त्यांनी दिली. मुलांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळण्यासाठी त्यांच्या अनुभवातील अनेक प्रसंग सांगितले. तसेच विज्ञानाच्या विविध शाखा मधील संशोधनामध्ये करिअरच्या वेगवेगळ्या संधी त्यांनी मुलांना सांगितल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सौ. सोनटक्के यांनी ज्ञानसाधना प्रतिष्ठान हे नेहमी विज्ञानाचा पुरस्कार करते, असे नमूद करीत विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टीतून विज्ञान सहज अवगत केले पाहिजे, नेहमी संशोधक व जिज्ञासू बनले पाहिजे, विद्यार्थ्याने नेहमी प्रत्येक गोष्टीचा विज्ञानातून विचार केला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे समन्वयक, विभागप्रमुख तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खंडेलवाल यांनी केले तर रोकडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


