परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर मंगळवारी (दि.17) रात्री खंडोबा बाजार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकनेते विजय वाकोडे यांचे पार्थीव दिवसभर राहुल नगरातील समाज मंदिरासमोरील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवण्यात आले. पार्थिवासोबत उपस्थित भिक्कू संघाने पंचशील व त्रिशरण घेतले. सायंकाळी राहत्या घरापासून वाकोडे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल नगरातून निघालेली अंत्ययात्रा महात्मा फुले कॉलनी, कारेगाव रोड मार्गे गौतम नगर, शिवाजी नगरातून वसमत रोडला पोहोचली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही अंत्ययात्रा पोहोचली.

या ठिकाणाहून हजारो अनुयायांच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा स्टेशन रोडमार्गे गांधी पार्क, छत्रपती शिवाजी चौकातून नानलपेठ कॉर्नर, अपना कॉर्नरमार्गे खंडोबा बाजार स्मशानभुमीत पोहोचली. रात्री 8.15 वाजता आशिष व सिध्दांत वाकोडे या दोन्ही मुलांनी अग्निडाग देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे नेते राहुल प्रधान, खा. संजय जाधव, आ. रोहित पवार, आ. राजू नवघरे, माजी आमदार सुरेश वरपूडकर,माजी आ. सुरेशदादा देशमुख, सुरेशराव गायकवाड, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या पत्नी, भीमराव हत्तीअंबिरे, सिध्दार्थ हत्तीअंबिरे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, रवि सोनकांबळे, माजी महापौर अनिता सोनकांबळे, परभणी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, डी.एन.दाभाडे, पुर्णा येथून आलेले प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील नागरिक आणि हजारो अनुयायांनी वाकोडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.


