परभणी,(प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.23) परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते स्व. विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
खा राहूल गांधी यांनी सोमवारी दुपारी 2.20 वाजता नांदेडहून परभणीत दाखल झाल्याबरोबर नवा मोंढ्यांतील स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्या पाठोपाठ आंबेडकरी चळवळीतील अग्रगणी ज्येष्ठ नेते स्व. वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी रवाना होवून वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. पाठोपाठ निवासस्थानी कुटूंबियातील सदस्यांबरोबर हितगुज सुरु केले.
खा राहुल गांधी यांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर त्यांचे आंबेडकरी चळवळीतील एकूण योगदान हे निश्चितच अमूल्य होते. जातीय सलोखा रहावा, शांतता रहावी यासाठी या ज्येष्ठ नेत्याने सुरु केल्या प्रयत्नांची दख घेण्याऐवजी वाकोडे यांना या घटनाक्रमात आरोपी ठरविण्याचे प्रशासन व सरकारची कृती ही दुर्देवी बाब आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोडे, मुलगा आशिष वाकोडे, सिद्धांत वाकोडे, मुलगी प्रियांका वाकोडे, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, सून शितल वाकोडे तसेच बंधू सुरेश वाकोडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खा. वर्षा गायकवाड, श्रीमती यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, माजी आ. सुरेश दादा देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, रवि सोनकांबळे, अमोल जाधव, सुनील तुरुकमाने आदी उपस्थित होते.


