परभणी:(प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानलपेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या वतीने दिला जाणारा सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांसाठीचा शाळारत्न हा पुरस्कार इयत्ता दहावीतील कु. श्रीया किरण लव्हेकर हिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. ए. झरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. विलासराव पोहंडूळकर , सदस्य श्री एम.जी.विहीटकर , सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर आदी होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे , उपमुख्याध्यापक आर.जी. तुम्मेवार , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा , पर्यवेक्षक प्रदीप रूघे, बळीराम कोपरटकर व सीमा बोके आदींची उपस्थिती होती.
यावेळी बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या वतीने दिला जाणारा सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांसाठीचा शाळारत्न हा पुरस्कार इयत्ता दहावीतील कु. श्रीया किरण लव्हेकर हिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अभिनय क्षेत्रामध्ये तिने राज्य पातळीवर आपले नावलौकिक केले आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. विवेक नावंदर म्हणाले की, *कला ही मानवाला जीवन जगण्याचा आनंद देते. कलेमुळे मानवाला आत्मिक समाधान मिळते. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. वार्षिक स्नेहसंमेलनातून उद्याचे मोठे कलावंत घडत असतात. ज्ञान आणि कला मानवाला समृद्ध बनवतात. त्यामुळे असे उत्सव होणे गरजेचे असते.*
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. झरकर म्हणाले की, *शाळारत्न हा बहुमानाचा सन्मान असून हा बहुमान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात पारंगत व्हावे. गुणी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी सुप्त गुण ओळखून त्याचा अविष्कार घडवीत असतो. तेव्हा कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ घडत असतात.*
शाळारत्न पुरस्कार प्राप्त श्रीया लव्हेकर हिने मनोगत व्यक्त करताना *संस्थेचे तसेच शिक्षकांचे आभार मानले. माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आज या शाळेने मला दिला आहे, असे मत तिने व्यक्त केले. प्रवाहातील करिअर शोधण्यापेक्षा कलेसारख्या क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी आई वडील व शाळेमुळे मला प्राप्त झाली आहे. त्यामुळे मी सर्वांची ऋणी आहे.*
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समूह ,वैयक्तिक नृत्य सादर केले तसेच वेशभूषा ,अभिनय याचे सादरीकरण झाले. अनेक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक प्राप्त केलेला गोंधळ गीत प्रकार सादर करण्यात आला. तसेच कुरुंदा येथे झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेतील द्वितीय क्रमांक प्राप्त अभिनयाचे सादरीकरण कु. श्रीया किरण लव्हेकर हिने केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी प्रशालेचा शैक्षणिक, सांस्कृतिक अहवाल मांडला.तर सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सुभाष ढगे यांनी केले.
या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी चे सेवानिवृत्त नियंत्रक ,दिवाकर काकडे उपस्थित होते.


