राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने…
लहानपणापासूनच मला सिनेमा पाहण्याची आणि गाणे ऐकण्याची आवड आहे. नीले गगन के तले धरती का प्यार मिले, नीले नीले अंबर मे चांद जब आये, निळ्या आभाळी कातरवेळी… अशी अनेक निळ्या आकाशाची आणि निळ्या समुद्राच्या पाण्याची गाणी ऐकत आलो
.पण,
मला कधी प्रश्न पडला नाही की आकाशाचा रंग निळा का?
किंवा समुद्राचं पाणी निळशार का?
या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळतं १९३० साली नोबल पुरस्कार प्राप्त केलेल्या सी.व्ही. रमण यांच्या शोधात.
मुळात त्यांनी काही या दोन्ही प्रश्नाची उत्तरे प्रत्यक्ष दिली नाहीत तो काही त्यांच्या संशोधनाचा विषय नव्हता.
सी.व्ही. रमण या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाला १९३० मध्ये प्रकाशाच्या विखुरण्यावरील (Scattering of light) त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.र मण यांनी शोधून काढले की जेव्हा प्रकाश पाणी किंवा हवा यांसारख्या माध्यमांतून जातो तेव्हा तो लहान रेणूंचा सामना करतो. हे रेणू प्रकाश सर्व दिशांना विखुरतात.
आकाश निळे का दिसते? तर जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा नायट्रोजन आणि ऑक्सिजन सारख्या वायूंचे लहान रेणू त्याच्या संपर्कात येतात.
हे रेणू प्रकाशाच्या लहान निळ्या तरंगलांबी लांब लाल तरंगलांबीपेक्षा जास्त विखुरतात. परिणामी, आपल्या डोळ्यांना सर्व दिशांनी पसरलेला निळा प्रकाश दिसतो, ज्यामुळे आकाश निळे दिसते.
रमणच्या प्रयोगात पाणी किंवा बेंझिनसारख्या द्रवाने भरलेल्या नळीतून प्रकाशाचा किरण पार करणे समाविष्ट होते.
त्याने निरीक्षण केले की विखुरलेल्या प्रकाशाची तरंगलांबी प्रकाशा पेक्षा वेगळी होती, ज्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की द्रवमधील रेणू प्रकाश विखुरण्यास जबाबदार आहेत.
रमणच्या या शोधामुळे आकाशाच्या निळ्या रंगाच्या पाठीमागच्या कारणां सोबतच रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा पाया घातला गेला.
आज रमण स्पेक्ट्रोस्कॉपीचा उपयोग पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो.त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ, प्रकाश विखुरण्याच्या घटनेला आता रमण स्कॅटरिंग म्हणून ओळखले जाते.
१९३० विज्ञानातील पहिलं नोबल पारितोषक रमण यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल. या घटनेला आता जवळपास ९५ वर्ष पूर्ण होत आहेत.
आपल्या देशामध्ये जन्मलेल्या पण परदेशामध्ये स्थायिक झालेल्या,तिथेच संशोधन करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांना विज्ञानाच नोबल पारितोषिक मिळालेल आपण वाचत आहोत.
पण
आपल्याच देशातील हैदराबाद या ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेमध्ये नोबल पुरस्कार प्राप्त होईल एवढ्या उच्च दर्जाचे काम करणारे रमण हे आमच्यासाठी फार गौरवाचे ठरतात.
विद्यार्थ्यांनी सी.व्ही. रमण यांचं जीवन चरित्र वाचल पाहिजे. त्यांची दिनचर्या कशी होती, ते कशा पद्धतीने अभ्यास करीत असत,ते कोणकोणती पुस्तक वाचायचे,कोणत्या पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळाली.असं सांगितलं जातं की सी.व्ही. रमण यांना पुस्तक वाचनाचा खूप छंद होता पण त्यांच्यावर प्रभाव होता तो अर्नाल्डो या लेखकांनी लिहिलेल्या लाईट ऑफ अशिया या पुस्तकाचा.
माझ्या शहरात शाळा, तालुका आणि जिल्हा स्तरावर अनेक विज्ञान प्रदर्शन भरवीले जातात.
मूलभूत विज्ञानाला डोळ्यासमोर ठेवून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केलेले असतात.
हे सर्व ठीक आहे.पण याच सोबत ग्रास रूट इनोव्हेशन, जुगाड संशोधन या अनुषंगाने विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठीची प्रेरणा निर्माण करावी लागेल.
प्रो.डॉ.अनिल के. गुप्ता आणि डॉ. रघुनाथ माशेलकर या दोघांनी मिळून ग्रास रूट इनोव्हेशन नावाचं पुस्तक लिहिल आहे.देशातील काही शेतकऱ्यांनी जे काही आपल्या स्तरावर ग्रास रूट इनोव्हेशन केले आहे त्याची खूप छान उदाहरणे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत.ती विद्यार्थ्यांनी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी वाचली पाहिजे.
नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहूजा यांनी कल्पक संशोधनासाठीचा नवा दृष्टिकोन, जुगाड हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केला आहे पुस्तकाची प्रस्तावना श्री.रतन टाटा आणि पुस्तक परिचय श्री. सॅम पित्रोदा यांनी केले आहे. हेही पुस्तक आपण अभ्यासलं पाहिजे.
आज विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साइत करणे फार गरजेचे आहे असं मला वाटतं.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने तर जगाच्या पातळीवर अनेक महत्त्वाचे शोध लावलेले आहेत.परभणी क्रांती ही भेंडीची व्हरायटी जगामध्ये प्रसिद्ध आहे, सोळा मायक्रो ऑरगॅनीझमला एकत्र करून तयार केलेल्या बायोमिक्सच्या माध्यमातून हळदी उत्पादनामध्ये मराठवाड्यात प्रचंड वाढ झालेली आम्ही पाहत आहोत,परभणी शक्ती ज्वारीच्या व्हरायटीच्या माध्यमातून झिंकचे फोर्टीफिकेशन केलेल आम्ही पाहत आहोत,सोयाबीन ७२५, ब्रॉड बेड फरो (बी. बी. एफ.) ही कोरडवाहू जमिनीसाठी वापरण्यात येणारी टेक्नॉलॉजी खूप प्रभावी आहे असे कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या चर्चेतून आम्ही ऐकत आहोत.
कृषी या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
असंतुलित रासायनिक खताचा वापर आणि पाण्याचा अति वापर यामुळे जमिनीची पोत बिघडत आहे ते संतुलित करण्यासाठीच चॅलेंज आमच्या समोर आहे, त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आणि मार्गदर्शकांनी विचार संशोधन केल पाहिजे.
प्राणी आणि वनस्पती ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती आहे.
डार्विन म्हणतो सर्वायव्हल ऑफ़ द फ़िटेस्ट”, हा सिद्धांत सहसा उत्क्रांतीवादी फिटनेस असे गृहीत धरतो.
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे जागतिक स्तरावरील प्रश्न जरी असले तरी अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीला निर्भिड सामोरे जाणाऱ्या काही व्यक्ती असतात त्यांच्यासारखी निर्भिडता वनस्पतीमध्ये रुजवण्यासाठी आम्हाला संशोधन करावे लागेल.
परभणीत अश्यात दुसऱ्यांदा काही डॉक्टरांनी एकत्र येऊन ग्रिन कॅरिडॉर यशस्वी केल आहे ,याच बरोबर लहरींच्या अभ्यासासाठी प्रस्तावित असलेल्या भारतातील ‘लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी’ (लायगो इंडिया) या खगोलशास्त्रीय महाप्रकल्प औंढा नागनाथ जवळ सुरू झालेला आहे.
महात्मा फुलेंचा एक खूप छान विचार आहे “थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली”…
परभणीच्या काळ्या कसदार मातीला जसी पांढऱ्या शुभ्र कापसाची भुरळ पडते तसे या परभणी शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विचाराची भुरळ पडली पाहिजे.
अशात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे,
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण काही सायन्स फेस्टिवलच आयोजन केल पाहिजे यामध्ये केवळ प्रयोगाची मांडणी न करता, त्यासोबत मराठी भाषेतून वैज्ञानिकाच्या मुलाखती, वेगवेगळ्या विज्ञानाच्या विषयावर परिसंवाद झाले पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी बंधनकारक केले पाहिजे,त्यातून वैज्ञानिक निर्माण होऊन ९५ वर्षापासूनचा विज्ञानाच्या नोबल पारितोषकाचा जो बॅकलॉग बाकी आहे त्या वाटेने जाण्याचा प्रवास सुखकर होईल.
आणि
त्याचबरोबर या वर्षाची राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याची थीम जी आहे,”विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सक्षम करणे” ती योग्य दिशेने उधिष्टा पर्यंत निश्चित पोहोचेल.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
संदर्भ:
१. ग्रास रूट इनोव्हेशन डॉक्टर अनिल गुप्ता आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर.
२. जुगाड, नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन अहुजा मराठी अनुवाद संध्या रानडे
३. गुगल विकिपीडिया
४. दैनिक लोकसत्ता
प्रो.डॉ. भीमराव खाडे
परभणी.


