परभणी (प्रतिनिधी) जागतिक बँक अर्थसहाय्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ), पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, “शेळी व कुक्कुटपालन सुधारण्यासाठी पशु सखींचे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम” या प्रकल्पा अंतर्गत, ‘ शेळी व परसातील कुक्कुटपालन या विषयावर’, पशु सखींचे दुसरे पंधरा दिवसीय निवासी प्रशिक्षण, पशुवैद्यकीय महाविद्यालयात, दिनांक 6 मार्च 2025, रोजी सुरू झाले.

पंधरा दिवस चालणाऱ्या या निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन, मा. डॉ. शैलेश केंडे उपायुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन पुणे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रशांत भाड, आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे होते. प्रमुख उपस्थिती डॉ केशव सांगळे, ज़िल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी आणि डॉ नामदेव आघाव, ज़िल्हा पशुसंवर्धन अधिकारी परभणी यांची होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ सुधीर राजूरकर हे होते. प्रारंभी प्रास्ताविक, प्रकल्प सहसमन्वयक डॉ सुनित वानखेडे यांनी केले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना, डॉ केंडे यांनी स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबद्दलच्या उपयुक्ततेची माहिती दिली. ग्रामीण महिला सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासना स्मार्ट या अभिनव प्रकल्पाद्वारे अश्या प्रकारचे प्रशिक्षणे आयोजित करीत असल्याचे त्यांनी उपस्थितांना अवगत केले. शेतीला पूरक अश्या, शेळीपालन आणि कुक्कुटपालन बद्दलचे प्राशिक्षण पुर्ण केल्याने ग्रामीण स्तरावर स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपस्थित प्रशिक्षणार्थी पशुसखींना मार्गदर्शन करतांना डॉ.प्रशांत भाड, म्हणाले कि पशुतील एखाद्या रोगाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी, ग्रामीण स्तरावर आजारी पशुना पशुवैद्यकाची सेवा मिळेपर्यंत पशुसखींचे मदत, योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीण स्तरावरील शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय यशस्वी ठरण्यासाठी पशुसखींची मदत होणार आहे म्हणुन अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आज गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सांगळे यांनी या भागामध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत , पशुपालन आणि संवर्धन या बाबतीतले प्रकल्प सुरू असून त्यांना भेट देण्याचे सुचित केले.
आपला अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप करताना महाविद्यालयाचे सहयोगी प्रतिष्ठाता डॉ सुधीर राजूरकर यांनी प्रशिक्षणातून तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचा उपयोग पशुसखीनी करावा असे आव्हान केले. पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी, पशुपालकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सदैव अग्रेसर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद खरवडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. काकासाहेब खोसे यांनी केले.
सदरील निवासी प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. सुनीत वानखेडे यांचे सोबत , प्रशिक्षण सह समन्वयक, डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. साजिद अली, डॉ. काकासाहेब खोसे आणि डॉ. मकरंद खरवडकर हे प्राध्यापकवृंद परिश्रम घेत आहेत. बीड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील 25 पासून सख्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


