परभणी,(प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारी औरंगजेबाची कबर तात्काळ हटवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.17) मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.
विहिंपचे क्षेत्रीय मंत्री अनंत पांडे, वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरू असोलेकर, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हामंत्री अॅड. राजकुमार भांबरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, गोरक्षाप्रमुख शिवप्रसाद कोरे, शहरमंत्री अभिजित कुलकर्णी, गोपाळ रोडे, सुनील रामपुरकर, रितेश जैन, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, योगेश तिवारी, प्रशांत जोशी, दीपक अग्रवाल, संजय रिझवानी, एस. तिवारी, संदीप भंडे आदींनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना या अनुषंगाने निवेदन सादर केले. त्या निवेदनातून उझबेगी परकी आक्रमक बाबर यांचा वंशर कु्ररकर्मा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. वास्तविकतः औरंगजेब अहिल्यादेवी नगरात मृत्यू पावले. त्यानंतर त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरात दफन करण्यात आला. त्या ठिकाणी कबर बांधण्यात आली. वास्तविकतः या औरंगजेबाने शीख गुरु तेगबहाद्दुर यांची क्रुर हत्या केली. त्यांच्या दोन मुलांना केवळ ते मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे गाडून मारले. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचीही क्रुरपणे याचे वर्णनसुध्दा करता येणार नाही, इतक्या भयावह यातना देवून हत्या करण्यात आली. श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर असो मथूरेचे सुंदर अशा मंदिराचे, सोरटी सोमनाथच्या मंदिराचे याच औरंगजेबने उध्वंश करीत मोठी तोडफोड केली. त्रिंबकेश्वर मंदिर, जेजूरी गडावर हल्ले केले. तसेच हजारो हिंदूंची ते मुस्लिम होत नाहीत म्हणून कु्ररपणे हत्या केली, अनेकांचे धर्मांतर करुन घेतले, अशा या क्रुरकर्म्या औरंगजेबचे स्मारक म्हणजे गुलामीचे अन् अनंत यातनांचे प्रतिक आहे, तेव्हा ही कबर पूर्णपणे नष्ट करावी व परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे, या दृष्टीने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या संतप्त पदाधिकार्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबची ही कबर न हटविल्यास कार्यकर्ते कारसेवेसाठी कुच करतील व ती कबर उध्वस्त करतील, असा इशाराही या दोन संघटनांच्या पदाधिकार्यांनी दिला.