पालम (प्रतिनिधि) अनेक दुर्धर आजारावरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चा करिता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. त्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असल्यामुळे नागरिकांना आपल्याच जिल्ह्यात वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात याकरिता परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षात अध्यक्ष म्हणून सद्या ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्राप्त झालेल्या अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांना, नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती/ प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरता अभियान चालविणे, जिल्ह्यात आयोजित आरोग्य शिबिरा बाबत समन्वय करणे इत्यादी कामे या कक्षामार्फत चालविली जाणार आहेत.सदरील कक्षात नवनाथ मुंतगे व संदीप निलकंठे यांचीही सदस्य म्हणून निवड झाली आहे. या कक्षात अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. इप्पर पालमकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.