गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न
‘परभणी (प्रतिनिधी)तंत्रज्ञानासोबत संस्कारांची रुजवणूक आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले. ते जुने ते सोने, नवे ते हवे’ या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील तालुका व जिल्हास्तरावरील विजेत्या शिक्षकांचा सन्मान परभणीत संपन्न झाला.यावेळीं बोलत होते.
ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची रुजवणूक होणे तेवढेच गरजेचे असल्याचे नमूद केले. “तंत्रज्ञान यूजर फ्रेंडली आणि नॉलेज फ्रेंडली असल्यासच ते खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य बाबर सर होते. डायटचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खुणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, ज्येष्ठ अधिव्याख्याते गणेश शिंदे, डॉ. अनिल मुरकुटे, शोभा मोकले आणि डॉ. अनिल जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
इयत्ता 1ली ते 11वीपर्यंतच्या सहा गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धक शिक्षकांना तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येत रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याते गणेश शिंदे यांनी प्रास्ताविकामधून स्पर्धेची रूपरेषा मांडली. डॉ. खुणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल जाधव व दलाल मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चव्हाण, टेकाळे, कापसे, सुरकुटे, निकरड आणि अन्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. शेवटी आभार प्रदर्शन ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. अनिल मुरकुटे यांनी केले.
—