परभणी,(प्रतिनिधी) येथील आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय बेशुद्ध अवस्थेत दाखल झालेल्या महिलेला टेम्पररी पेस मेकर या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत जिवदान दिले आहे.
आ.राहुल पाटील यांच्या आर. पी. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेली ६२ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत दाखल झाली होती.रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने केलेल्या इसीजी व इतर तत्सम तपासणीनंतर तिचे हृदयाचे ठोके अनियमित व अतिशय कमी प्रमाणात होते, अपुरे रक्तपुरवठ्यामुळे हृदययाची स्पंदने निर्माण करणारे नोड अतिशय कमकुवत झाले असे आढळले. हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्याचे ठरले, परंतु हृदय गती अतिशय कमी असल्या कारणाने (कम्प्लिट हार्ट ब्लॉक ) यावर उपचार म्हणून हृदयात टेम्पररी पेस मेकरचा वापर करण्यात आला. टेम्पररी स्पेस मेकर हे एक अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण आहे, जे हृदयाला संकेत पाठवून त्याची गती नियंत्रित करते आणि हृदयाचे ठोके नियमित ठेवते. या उपकरणाद्वारे हृदयाची गती स्थिर ठेवल्यानंतर रुग्णावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. दोन स्टंट टाकून एन्जियोप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची हृदय गती पूर्णपणे सामान्य झाल्याने स्पेस मेकर काढून टाकण्यात आले आणि योग्य उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दीपक कुबडे मेडिसिन विभागाचे डॉ. संतोष हारकळ, डॉ. शहाजी बोडखे, आणि डॉ. सलाम तांबोळी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल आमदार डॉ राहुल पाटील व तसेच आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे , वैद्यकीय अधीक्षक डॉ अमीर तडवी यांनी संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन केले.
डॉ. प्रमोद शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “आर. पी. हॉस्पिटलच्या प्रगत वैद्यकीय सुविधांमुळे आता रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही कायम तत्पर राहू.” या यशस्वी उपचारामुळे आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेची विश्वासार्हता आणि क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.