परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नानलपेठ येथे शिक्षक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते. मंचावर प्रशालेचे उप मुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, प्रशालेतील ज्येष्ठशिक्षक ज्ञानेश्वर पंडित, समुपदेशक प्रवीण सोनोने आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुभाष ढगे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सर्व शिक्षकवृंदाना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष ढगे म्हणाले की, *शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो. शिक्षक नेहमी विद्यार्थ्या प्रती चिंतनशील, सृजनशील व उपक्रमशील असतो. विद्यार्थ्याचे जीवन सुखकर व्हावे यासाठी नेहमी मेहनत घेत असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी सुसंवाद ठेवून आपले भविष्य उज्वल केले पाहिजे.*
अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक अरुण बोराडे म्हणाले की, *शिक्षक नेहमी सजग असला पाहिजे. शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांमध्ये समरस झाले पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी शिक्षकां प्रती कृतज्ञता व्यक्त करत. शिक्षकांकडून ज्ञानाचे धडे घेऊन आपले ध्येय साध्य केले पाहिजे.*
यावेळी विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रके तयार केली होती. त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
हा कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववा ड च्या वर्गाने केले होते. त्यांना वर्गशिक्षक शंकर शेळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन कु. रश्मी भारती, कु. हर्षदा कुकडे, कु.अक्षरा चव्हाण, कु. आयुषी सिद्ध यांनी केले तर आभार चि. साईनाथ कोटलवार,श्रेयस राऊत यांनी मानले.


