परभणी (प्रतिनिधी) : तहसिल कार्यालय, परभणी येथे आज दुपारी 12 वाजता पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेच्या अनुषंगाने परभणी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मा. उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंग भोसले यांनी स्वीकारून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की पदवीधर मतदार नोंदणी ही लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी अत्यावश्यक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक शासकीय विभागाने जबाबदारीने व समन्वयाने हे कार्य पार पाडले पाहिजे. कोणताही पात्र पदवीधर मतदार यादीतून वंचित राहू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी पूर्ण दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जनजागृती मोहिमांचे नियोजन, अर्ज पडताळणीची कार्यपद्धती आणि विभागीय समन्वय या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी नायब तहसिलदार श्री. सुनिल कांबळे, सहाय्यक महसूल अधिकारी श्री. मदन चव्हाण, तांत्रिक सहाय्यक श्री. बाळासाहेब साळवे आणि श्री. पठाण वसीम अहमद खान उपस्थित होते. बैठकीचा शेवट सर्व अधिकाऱ्यांनी एकमताने पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याच्या निर्धाराने झाला.


