परभणी ( प्रतिनिधी) परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या टि.एम.सी. मार्केट यार्डात आज दिनांक २१ रोजी शुक्रवारपासुन खाजगी व्यापा-यांमार्फत कापुस खरेदीस प्रारंभ होणार आहे.
परभणी बाजार पेठेत खाजगी व्यापा-यांमार्फत कापुस खरेदीस प्रारंभ होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मार्केट यार्डात कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावुन जाहिर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या बाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत. कोणत्याही प्रकारे जिनींग आवारात परस्पर वाहने घेऊन न जाता दुपारी १२ वाजेपर्यंत टि.एम.सी. मार्केट यार्डात आणावीत. उशिराने येणा-या वाहनधारकांची निश्चीतच गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परभणी बाजार समिती शेतक-यांचे हितासाठी सदैव तत्पर असुन, शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीस आणतेवेळी कापुस ओला न आणता स्वच्छ स्वरुपात विक्रीस आणावा. चांगल्या प्रतीचा कापुस हा वेगळा व खराब प्रतीचा कापुस वेगळा करुन आणल्यास बाजार भावाबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नसुन, ज्या योगे कापसास जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला कापुस परभणी बाजार समितीच्या टि.एम.सी. मार्केट यार्डात विक्रीस आणावा, परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत बाजार समितीचा परवाना हस्तगत न करता कांही व्यापारी अनधिकृतपणे शेतीमालाची खरेदी करीत असून, असा शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार करणारे व्यापारी निदर्शनास आल्यास बाजार समितीस संपर्क साधावा जेणे करुन संबंधित व्यापा-याविरोधात बाजार समिती कायद्यानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. शेतकरी बांधवांनी अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी विक्री करणा-या व्यापा-यांच्या अमिषाला बळी न पडता बाजार समितीचा अधिकृत परवानाधाक व्यापा-यांना आपला शेतीमाल विक्री करुन संबंधितांकडून अधिकृत हिशोबपट्टी हस्तगत करावी. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. पंढरीनाथ घुले, उपसभापती श्री. अजय चव्हाण, सर्व संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केले


