परभणी (प्रतिनिधी) भारतीय बाल विद्या मंदिर, प्रभावती नगर परभणी येथे दि. 09 जानेवारी 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने शालेय मुला-मुलींची मानसशास्त्रीय कलचाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा मानसशास्त्रीय कलचाचणी उपक्रम कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
उपक्रमाचा भाग म्हणून विद्यालयीन मुलींना त्यांच्या आवडी, क्षमता व व्यक्तिमत्त्वानुसार योग्य करिअरची निवड करता यावी, तसेच भविष्यातील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळावी, या उद्देशाने इंटरेस्ट प्रोफाईलर चाचणी घेण्यात आली. या नावीन्यपूर्ण उपक्रमात इयत्ता नववी मधील मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी मुला-मुलींना त्यांच्या व्यक्तिमत्त्व व कलानुसार वैयक्तिक चाचणी निकाल व करिअर मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत झाली असून करिअर नियोजनासाठी योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करत मुला-मुलींनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक युवक-युवतींची मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सक्रियपणे कार्यरत आहे.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी मदन शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती जालना येथील मॉडेल करिअर सेंटरचे समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांच्या वतीने ही चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. सदरील कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातील कर्मचारी राहूल गजभारे, प्रविण रुद्रकंठवार, प्रियंका कणके, अंकुश कदम, सुमित दिक्षीत, विवेक भारती, राहूल काळे, सचिन चव्हाण व भारतीय बाल विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. आळंदकर व शाळेचे शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.
*-*-*-*-*-*


