परभणी (प्रतिनिधी) प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजांची आवश्यकता असते परंतु जीवन आनंद जगण्यासाठी कोणत्यातरी कलेची आवड असणे आवश्यक आहे. कला ही मानवी जीवनात आनंद भरते. फुल सुंदर असून चालत नाही तर त्याचा सुगंध घ्यावा लागतो. तसे जीवन सुंदर करण्यासाठी कला आवश्यक असते. कारण कला ही मानवी जीवन फुलवते. असे प्रतिपादन प्रसिद्ध बाल नाटककार त्रंबक वडस्कर यांनी बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल नानल पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रसिद्ध बालनाटककार तथा महाराष्ट्र राज्यशासन आदर्शशिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक त्र्यंबक वडसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरूण बोराडे हे होते. तर यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना वडसकर म्हणाले की, शिक्षकांनी अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कलागुण विकसित करावेत. गुरूजी होऊन विद्यार्थ्यांना दर्पण दयावे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास सकारात्मकता व शिक्षकांवरती विश्वास या तीन गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात कराव्यात. कला व ज्ञानाचा संगम घडून आणावा. नक्की त्यांचे जीवन समृद्ध होईल.
प्रसंगी अध्यक्ष समारोप करताना प्राचार्यअरूण बोराडे म्हणाले की, स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी प्राप्त झालेले रंगमंच होय. बाल विद्यामंदिर चा इतिहासात अनेक कलावंत या रंगमंचाने निर्माण केले. त्यांनी आज राज्य,राष्ट्र पातळीवर कलावंत म्हणून नाव लौकिक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोनं करून घेतले पाहिजे. कारण शालेय जीवनातच कला गुणांचा विकास होत असतो.
यावेळी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, अभिनय व वेशभूषा,पोवाडे,नाटिका, गीतगायन सादर केले. अनेक नृत्य प्रकारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. आदिती जाधव व आदिती डोंबे यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सुभाष ढगे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख गजानन जुमडे, सुभाष ढगे, ज्ञानेश्वर पंडित,सौ. प्रिती जोशी, सौ. जयश्री महामुने, केशव लगड, रमाकांत पैंजणे, प्रफुल्ल शहाणे,अमित मोगल, गजानन लोनसने आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


