परभणी (प्रतिनिधी) सोरायसिस हा दीर्घकालीन त्वचारोग असून, त्यावर प्रभावी उपचार मिळणे रुग्णांसाठी मोठे आव्हान असते. परंतु आता आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PUVA थेरेपी (फोटोथेरेपी) उपलब्ध झाली असून, यामुळे रुग्णांना नवीन आशा निर्माण झाली आहे.
दैठणा गावातील एक दीर्घकालीन सोरायसिस रुग्णावर डॉ.मनीष कदम,डॉ.दिनेश भुतडा,डॉ.रेवती यांच्या कुशल उपचारामुळे PUVA थेरेपीचा यशस्वी वापर करण्यात आला. या रुग्णावर लाईट थेरेपीसह योग्य औषधोपचार करून आजार पूर्णपणे नियंत्रित झाला असून, रुग्ण पूर्णतः बरा होऊन आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णाच्या त्वचेवरील लालसर, जाड, पांढऱ्या खवलेदार डाग पूर्णपणे निघून गेले असून, त्याला मोठा आराम मिळाला आहे.
सोरायसिस म्हणजे काय?
सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यात त्वचेवर लालसर, जाड आणि पांढऱ्या खवल्यांनी झाकलेले डाग दिसतात. हा ऑटोइम्यून आजार असून, काहीवेळा सांधेदुखी (psoriatic arthritis) पर्यंत पोहोचू शकतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार चांगल्या प्रकारे नियंत्रित राहतो.
PUVA (Psoralen + Ultraviolet A) थेरेपी ही सोरायसिससाठी अत्यंत प्रभावी अशी आधुनिक लाईट थेरेपी आहे. यात विशेष औषध (psoralen) घेऊन UVA किरणांचा वापर करून त्वचा कोशिकांच्या अनियंत्रित वाढीला आळा बसवला जातो. आर.पी. हॉस्पिटलमध्ये ही सुविधा आता उपलब्ध झाल्याने स्थानिक रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, “आर.पी. हॉस्पिटलमध्ये त्वचारोग विभागाला अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. PUVA थेरेपीसारख्या अत्याधुनिक उपचारांमुळे सोरायसिससारख्या दीर्घ आजारांवर चांगले नियंत्रण मिळू शकते. आम्ही रुग्णांना सर्वोत्तम आणि परवडणारे उपचार देण्याचे आव्हान स्वीकारले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील, अधिष्ठाता डॉ प्रमोद शिंदे यांनी केले.


