परभणी(प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे राज्य शासनाने गुरुवारी(दि. ३०) बदली आदेश काढले आहेत. यासंदर्भात शासनाचे सहसचिव सुग्रीव संभाजी धपाटे यांनी आदेश जारी केले आहेत.
परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईच्या उपायुक्तपदी तर अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव या आस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. याच आदेशान्वये अमरावती ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची परभणीच्या नूतन पोलीस अधीक्षक पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक म्हणून रवींद्रसिंह परदेशी त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत आणि कुठल्याही अप्रिय घटनांशिवाय पार पडल्या. तर नव्या दमाचे आणि तरुण अपर पोलीस अधीक्षक म्हणून सुरज गुंजाळ यांना साधारण वर्षभराचा कालावधी परभणी जिल्ह्यात मिळाला. या छोट्या कार्यकाळातही सुरज गुंजाळ यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
______


