परभणी,(प्रतिनिधी) : सक्षम व जबाबदार युवक घडविण्यासाठी तसेच आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले.
परभणी शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘आत्मचिंतन दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष अॅड. विलासराव पोहंडूळकर, सहसचिव अॅड. संजय देशपांडे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, संस्थेचे सदस्य पवनकुमार झांजरी, एम. जी. विहिटकर, डॉ. अनिता विवेक नावंदर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. महेश पाटील, डॉ. हरिभाऊ पाटील, भगवान पाटील, मुख्याध्यापक संघाचे राजू शिंदे, मराठी गझलकार आत्माराम जाधव, मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक प्रदीप रूघे, बळीराम कोपरटकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव, बाल विद्याविहारचे विभाग प्रमुख नितीन गोराडकर, बाल विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश कापसे, बाल विद्या फाउंडेशनचे व्यवस्थापक सुनील घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकर म्हणाले, शिक्षक हा समाज घडवणारा सर्वात महत्त्वाचा घटक असून राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान अनमोल आहे. उद्याचा सक्षम, सुसंस्कृत आणि जागृत नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी असलेला विश्वास हा अनेकदा पालकांपेक्षाही अधिक दृढ असतो. शाळा-संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे शिक्षण व्यवस्थेचे चार आधारस्तंभ असून या चारही घटकांच्या प्रभावी समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो. सक्षम व जबाबदार युवक घडविण्यासाठी तसेच आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सतत चिंतनशील राहणे आवश्यक आहे. ज्ञानाचे क्षेत्र वेगाने बदलत असताना अद्ययावत राहण्यासाठी आत्मचिंतन हा प्रभावी मार्ग आहे. स्वतःमधील उणिवांचे परीक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे, भविष्यासाठी योग्य नियोजन करणे आणि अध्यापन अधिक प्रभावी बनविणे यासाठी शिक्षकांनी नियमित आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेत दरवर्षी आयोजित केला जाणारा आत्मचिंतन दिन हा शिक्षकांच्या आत्मपरीक्षणाचा आणि गुणवत्ता वृद्धीचा आदर्श उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. नंदकुमार झरकर यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास हा संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचार्यांच्या त्याग, समर्पण व निष्ठेचे फलित असल्याचे सांगितले. हा सुवर्ण इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी आत्मचिंतनाची परंपरा कायम ठेवत उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी आत्मचिंतन दिनामागील उद्देश स्पष्ट करत संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. मागील दहा वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये नवचेतना, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक काळातील विविध शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मचिंतन हे अत्यंत प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मान्यवरांचा परिचय समुपदेशक प्रवीण सोनोने आणि चंद्रकांत सिरसकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार यांनी केले. जयश्री महामुने यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आत्मचिंतन व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली…
प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांनी आत्मचिंतनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आत्मचिंतन ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृती, विचार आणि ध्येयांचा नियमित आढावा घेतला तर यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो. जग जिंकण्यापूर्वी स्वतःवर विश्वास असणे आवश्यक असून आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. ज्याचा स्वतःवर, विश्वावर आणि ईश्वरावर विश्वास असतो तोच खर्या अर्थाने आत्मविजयी ठरतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून ध्येय, कर्तव्य आणि आत्मीयता या तीन मूल्यांवर संस्थेची प्रगती अवलंबून असते. या मूल्यांच्या बळावर बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेने दैदीप्यमान इतिहास घडविल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकी पेशा हा भाग्यवान व्यक्तींनाच लाभतो, असे नमूद करताना त्यांनी शिक्षक हे ईश्वराचे रूप असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपले कार्य प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करणे आवश्यक आहे. भौतिक आनंदापेक्षा आत्मिक समाधान अधिक महत्त्वाचे असून कोणतेही कार्य मनापासून केले तर त्यात यश निश्चित मिळते. शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांतूनच आत्मनिर्भर भारताची उभारणी शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


