परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत विष्णू जिनिंग परिसरातील बंद करण्यात आलेल्या कचरा कुंडीत पुन्हा कचरा टाकणार्या व्यापार्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. याचवेळी सिंगल-यूज प्लास्टिक, कॅरीबॅग आणि प्लास्टिक कंटेनरचा वापर करणार्या व्यापार्यांवरही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाने राबविलेल्या या संयुक्त मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणार्या संबंधित व्यापार्यांकडून एकूण 6 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच बंद करण्यात आलेल्या कचरा कुंड्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अशा प्रकारच्या कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सिंगल-यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असल्याने त्याचे उल्लंघन करणार्यांविरुद्धही दंडात्मक मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील.
ही कारवाई महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, तुकाराम कदम, सहाय्यक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा तसेच स्वच्छता निरीक्षक शशी लहाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबविली.
दरम्यान, शहरातील नागरिक आणि व्यापार्यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे, ओला व सुका कचरा वेगळा करावा तसेच सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर बंद करून महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


