परभणी, (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)मार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून २४ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. शिष्यवृत्तीचे वितरण मुख्यालय, मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीनुसार गुणवत्तेच्या क्रमाने करण्यात येणार आहे.
अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व रेशन कार्डच्या छायाप्रती, गुणपत्रिका, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र अथवा पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे दि. १४ जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*


