परभणी,(प्रतिनिधी) : दिल्लीतील भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात सोमवार 13 जूलै रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठविण्यात आले. त्याद्वारे, नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमधून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या विधानांमुळे देशभरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देशातील विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तक्रारी व गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून मुस्लिम संघटनांनी आंदोलनही केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समाजामध्ये धार्मिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता अबाधित राखण्यासाठी धर्म, जाती किंवा समाजाविरोधात द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक वक्तव्ये करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही धर्माबद्दल अवमानकारक भाष्य करणे हे सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचविणारे असून अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते किंवा सार्वजनिक जीवनातील व्यक्तींकडून समाजामध्ये तेढ निर्माण करणारी विधाने केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धार्मिक भावना दुखावणार्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या थोर महापुरुषांविषयी सामाजिक माध्यमे किंवा सार्वजनिक व्यासपीठांवरून करण्यात येणार्या आक्षेपार्ह विधानांनाही प्रतिबंध घालावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांच्या श्रद्धास्थानांचा सन्मान राखला जावा आणि महापुरुषांविषयी अवमानकारक भाषा वापरणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. नाझिया इलाही खान यांनी केलेल्या कथित वक्तव्यांची सखोल चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज….
भाजपा नेत्या नाझिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नवा मोंढा पोलीस ठाणे परभणी येथे तक्रार अर्ज देण्यात आला. यावेळी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, शहराध्यक्ष रविराज देशमुख, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, नागसेन भेरजे, रामभाऊ घाटगे, अलमगीर खान, बंडू पाचलिंग, अमोल जाधव, अजित वरपूडकर, गणेश घाटगे, शेख सलमान, शेख नासेर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


