परभणी,(प्रतिनिधी) : दोन पिढ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या वैचारिक भेद असतो. आधीच्या पिढीच्या तुलनेत नंतरची पिढी अधिक व्यापक आणि प्रगल्भ विचार करते. आजची ‘जेन-झी’ पिढी स्वतंत्र, चिकित्सक आणि आधुनिक विचार करणारी असून ती परंपरा व संस्कार जपत आधुनिकतेसोबतही वाटचाल करते. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजानेही काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून या पिढीला समजून घेण्याची गरज आहे. ‘जेन-झी’ संस्कारित आहे; मात्र तिच्या विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, असा सूर नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात गणेशोत्सव व्याख्यानमालेतील परिसंवादात उमटला.
गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या 65 व्या वर्षातील दुसरे पुष्प म्हणून मंगळवारी ‘आजच्या मुलांची बदलती मानसिकता’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी गजानन कोचिंग क्लासेसचे संचालक संतोष कुलकर्णी होते. परिसंवादात परभणी येथील बाल विद्या मंदिर हायस्कूलचे सहशिक्षक व समुपदेशक प्रवीण सोनवणे, सेलू येथील दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे, आजोबा म्हणून रामकिशन सोळंके, नूतन कन्या प्रशालेचे सहशिक्षक शशिकांत देशपांडे तसेच ‘जेन-झी’चे प्रतिनिधी सान्वी बाबासाहेब हेलसकर आणि जय विजय चौधरी सहभागी झाले.
जय विजय चौधरी यांनी आजची पिढी तार्किक विचार करणारी असून अंधश्रद्धेला थारा देत नाही, असे सांगितले. सामाजिक माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत असलो तरी सोशल मीडियाच्या आहारी गेलेली ही पिढी नाही. पालकांनी मुलांवर अनावश्यक दडपण आणू नये. स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने मुलांनी पूर्ण करावीत, अशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सान्वी हेलसकर यांनी मुलांवर कुटुंबातील वातावरणाचा मोठा प्रभाव पडतो, असे सांगितले. पालकांच्या हातात सतत मोबाईल असेल तर मुलांकडूनही त्याचे अनुकरण होण्याची शक्यता असते. पालकांनी पुस्तक वाचनाची सवय लावल्यास मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. सोशल मीडिया आणि मोबाईल हेच खरे आयुष्य नसून ङ्गरिल लाईफफच्या मोहात ङ्गरियल लाईफफ विसरू नये. त्यासाठी कुटुंबात संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अस्मिता मोरे यांनी मुलांना संयम शिकविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध होत असल्याने मुलांमध्ये हट्टाची प्रवृत्ती वाढू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना अतिलाड न करता चांगले-वाईट यातील फरक समजावून सांगावा आणि योग्य संस्कार करावेत. मुला-मुलींनी नैतिक मूल्ये जपत सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रामकिशन सोळंके यांनी शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून चांगला माणूस घडण्याचा प्रयत्न करावा. परंपरा, आई-वडील आणि गुरूजनांचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले.
शशिकांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत पालक व शिक्षकांनी बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. पालकांनी आपल्या पाल्याचे केवळ पालक न राहता मित्र, सल्लागार आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. ज्ञानाचा योग्य वापर करण्याची शिकवण मुलांना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रवीण सोनवणे यांनी मुलांनी वर्तमानात जगतानाच भविष्याबाबत सजग राहावे, असे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे; मात्र त्याचवेळी सजग पालकत्वाची भूमिकाही निभावावी. मुलांना ‘गरज’ आणि ‘इच्छा’ यातील फरक समजावून सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात संतोष कुलकर्णी यांनी दोन पिढ्यांमधील वैचारिक अंतर समजून घेऊन पाल्यांना घडविण्याची गरज व्यक्त केली. संपन्न व्यक्तिमत्त्वाची आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी प्रथम पालकांची आणि त्यानंतर शिक्षकांची आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. पोर्णिमा जोहिरे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या फुलपगार यांनी, तर आभार प्रणिता सोलापुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रशेखर मुळावेकर, श्रीपाद कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक संतोष पाटील, सुधीर जोशी तसेच गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या संयोजकांनी पुढाकार घेतला.


