परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील प्रारूप मतदान केंद्रांबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक), नायब तहसीलदार (निवडणूक), विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
परभणी जिल्ह्यात ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 76 प्रारूप मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तालुकानिहाय प्रस्तावित मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे परभणी 22, जिंतूर 10, सेलू 08, मानवत 06, पाथरी 06, गंगाखेड 07, पालम 06, सोनपेठ 4 आणि पूर्णा 07.
प्रस्तावित मतदान केंद्रांची यादी सध्या प्रारूप स्वरूपाची असून, त्याबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून सदर प्रारूप यादी ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाकडून आवश्यक मान्यता प्राप्त झाल्यानंतर अंतिम मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीत मतदान केंद्रांची निश्चिती करताना मतदारांची सोय, भौगोलिक सुलभता, उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बैठकीच्या शेवटी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
***


