परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल येथील शिक्षक श्री प्रवीण मनोहरराव सोनोने हे नियत वयोमानानुसार 31 वर्षाच्या प्रदीर्घसेवे नंतर 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलासराव पोहंडूळकर, संस्थेचे सदस्य ॲड. अशोक सोनी, श्री पवनकुमार झांजरी, सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर, श्री एम. जी. विहीटकर , मुख्याध्यापक अरूण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार सत्कारमुर्ती प्रवीण सोनोने,पत्नी सौ. प्रियंका सोनोने, आई सुमन सोनोने आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवीण सोनोने यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे सदस्य ॲड. अशोक सोनी,पवनकुमार झांजरी, डॉ. अनिता विवेक नावंदर, एम. जी. विहीटकर यांनी आपल्या मनोगतातून प्रवीण सोनोने यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा मांडत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री प्रवीण सोनोने यांनी आपल्या मनोगतात संस्थेविषयीची कृतज्ञता व्यक्त करत. 31 वर्ष संस्थेने माझे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी पूर्णपणे पाठबळ दिले. त्यामुळेच मी समुपदेशनाचे काम करू शकलो. विद्यार्थ्यांना दैवत मानून निरंतर अध्यापनाचे काम केले. त्यामुळे सेवानिवृत्त होताना सुद्धा आत्मिक आनंद प्राप्त झाला आहे. आई-वडिलांचे संस्कार, स्वर्गीय पांडुरंग नावंदर व स्वर्गीय वासंतीताई नावंदर यांची शिकवण तसेच पत्नीची खंबीर साथ यामुळे अध्यापनाबरोबरच विविध क्षेत्रात काम करता आले. त्यामुळे मी या सर्वांचा आयुष्यभर कृतज्ञ राहील.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले की, *”बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेची गुणवत्ता ही ज्ञानवंत जिज्ञासू व उपक्रमशील शिक्षकांमुळे टिकून आहे. अशा शिक्षकांना संस्थेने नेहमी प्रोत्साहन दिले आहे. शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असला पाहिजे. त्यांनी नेहमी नवीन नवीन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. याच पद्धतीने श्री सोनोने यांनी हिंदी व इतिहास या विषयाचे अध्यापन करत असतानाच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे करिअर मार्गदर्शन क्षेत्र निवडले. म्हणूनच त्यांची महाराष्ट्र राज्य शालान्त परीक्षा मंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून निवड झाली होती. मानसशास्त्रीय चाचणीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवल्या. व त्यांचे जीवन योग्य मार्गावर नेले. अशा आदर्शवत शिक्षकांचा सन्मान करताना मला आनंद होत आहे.”*
या प्रसंगी सौ. प्रियंका सोनोने, डॉ. गौरव सोनोने, प्राचार्य अनिल बोरनारे, पर्यक्षक प्रदिप रूघे, डॉ. अतुल जाधव, डॉ. गजानन जूमडे, नारायण कदम व रमाकांत पैंजणे, पत्रकार सुरेंद्र पाथरीकर आदीनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष ढगे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेतील कर्मचारी मित्रपरिवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


