परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दिवाळीत ‘दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंदणी दि. 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन करता येणार असून, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरे, गृहसंकुल, शैक्षणिक परिसर किंवा उपलब्ध जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २०२५ मध्ये ‘Maratha Military Landscapes of India’ या नावाने राज्यातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या काळात पारंपरिक सांस्कृतिक प्रथा-परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लहान-मोठ्यांनी एकत्र येऊन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम व्यापक करण्याचा उद्देश आहे.
दुर्गोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://www.amrutdurgotsav.com/ वर नोंदणी करावी. स्वतः तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढून ते संकेतस्थळावर अपलोड करताना नोंदणी अर्जामध्ये वैयक्तिक व संपर्कविषयक माहिती अचूकपणे लिहावी. संस्थेमार्फत प्राप्त नोंदणी आणि छायाचित्रांची प्राथमिक पडताळणी करण्यात येईल. नोंदणी व छायाचित्र वैध आढळल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल स्वरूपातील ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येईल.
दुर्गाची प्रतिकृती स्वतः तयार केलेली असणे आवश्यक आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून घेतलेली छायाचित्रे अथवा व्हिडिओ अपलोड करून सहभाग नोंदविता येणार नाही. छायाचित्रात सहभागी व्यक्ती आणि दुर्गाची प्रतिकृती स्पष्ट दिसावी. एकाच छायाचित्राचा पुनर्वापर, बनावट छायाचित्र किंवा चुकीची माहिती आढळल्यास संबंधित नोंदणी अमान्य करण्यात येऊ शकते.
प्रतिकृती तयार करताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, अग्निसुरक्षा मार्ग किंवा सार्वजनिक वापराच्या जागांवर अडथळा निर्माण होणार नाही, तसेच कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.
दुर्गोत्सवात जगातील कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला, संस्थेला, गृहसंकुलाला, गटाला किंवा शैक्षणिक संस्थेला सहभागी होता येईल. सहभाग पूर्णपणे ऐच्छिक असून, डिजिटल अभिनंदन पत्र हे केवळ सहभागाची नोंद म्हणून देण्यात येणार आहे. त्यातून कोणताही रोख किंवा आर्थिक लाभ, पारितोषिक अथवा अन्य आर्थिक हक्क निर्माण होणार नाही.
दुर्गोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासह गड-किल्ल्यांविषयी अभिमान, संवर्धनाची भावना आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’चे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.
*****


