पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण*
परभणी, दि.16(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडाव्यात, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त डॉ. प्रताप काळे यांनी आज येथे केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारी पार पडले. यामध्ये निवडणूक प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी या प्रशिक्षणात विविध महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण व शैलेश लाहोटी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव आणि सर्व तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी अपर विभागीय आयुक्त डॉ. प्रताप काळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्पे, मतदानाच्या दिवशी घ्यावयाची दक्षता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष कामकाजात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य परिस्थितींची उदाहरणे देऊन निवडणूक प्रक्रिया त्रुटीविरहित पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी केल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये, निवडणूक साहित्याची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी आणि मतदान केंद्रावरील कामकाज करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतपेटी हाताळण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. मतपेटी हाताळण्याची योग्य पद्धत, त्यासंदर्भातील खबरदारी आणि मतदान प्रक्रियेतील तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात आल्या. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जबाबदारी पार पाडताना प्रक्रियेतील त्रुटी टाळण्यास मदत होणार आहे.
या कार्यशाळेत निवडणूक प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या टप्प्यांची सविस्तर माहिती देत केंद्राध्यक्षांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मतदानाचे स्वरूप, मतपत्रिकेचा वापर, मतपेटी सीलबंद करण्याची कार्यपद्धती, फॉर्म क्रमांक सी-१६ भरण्याबाबतची दक्षता आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. मतदानासाठी वापरण्यात येणारी एक मतपेटी भरल्यानंतर दुसरी मतपेटी वापरताना घ्यावयाची खबरदारी, तसेच स्थळप्रतीवर उमेदवाराची स्वाक्षरी आवर्जून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी निवडणूकविषयक नियम, सूचनांचे आणि निर्धारित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही डॉ. प्रताप काळे यांनी दिल्या.
0५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असून, एकूण ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक टप्प्यावर आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना अपर विभागीय आयुक्त डॉ. प्रताप काळे यांनी दिल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करताना घ्यावयाची दक्षता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे आवश्यक असल्याचे सांगून मतदानाची पद्धत समजावून सांगितली.
मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूकविषयक साहित्य ताब्यात घेताना निवडणूक केंद्राध्यक्षांनी घ्यावयाची खबरदारी, सर्व साहित्य तपासून घेणे, मतपत्रिकेवर मतदान असल्यामुळे जांभळ्या रंगाचा स्केचपेन, मतपत्रिका, मतपेटी आणि इतर सर्व साहित्य व्यवस्थित तपासून घेण्याचे सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिल्या.

*-*-*-*-*-*


