परभणी,(प्रतिनिधी) : 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 अंतर्गत परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (23 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजेपर्यंत सरासरी 61.81 टक्के इतके तात्पुरते (टेंटेटिव्ह) मतदान नोंदवले गेले आहे.
जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून या मतदानाची अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील एकूण 76 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या एकूण 26,684 मतदारांपैकी (21,186 पुरुष व 5,478 स्त्री) दुपारी 4 वाजेपर्यंत 16,482 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 13,687 पुरुष आणि 2,795 महिला मतदारांचा समावेश आहे.
टक्केवारीचा विचार करता, दुपारी 4 वाजेपर्यंत पुरुषांचे 64.60 टक्के आणि महिलांचे 51.02 टक्के मतदान झाले असून एकूण मतदानाची टक्केवारी 61.81 टक्के नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती परभणीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली.


