परभणी (प्रतिनिधी) जिंतूर रोडवरील पाथरी बायपास परिसरात दरोडा टाकण्याच्या आणि बनावट नोटांच्या साहाय्याने फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरजिल्हा टोळीला परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. पोलिसांनी कारवाई करत ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कार, शस्त्रे, मोबाईल आणि बनावट नोटांसह एकूण ४ लाख ५७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. तानाजी चिखले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पथक शहरात गस्त घाबत होते.
या दरम्यान, जिंतूर रोडवरील पाथरी बायपास रोडवर काही इसम तोंडाला पांढरा रुमाल बांधून, हातात तलवारी व लोखंडी रॉड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मापुरी शिवारातील जिंतूर ते पाथरी बायपास रोडवरील पुलाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास सापळा रचला. तेथे अंधारात एक संशयित Hyundai i20 कार थांबलेली आढळली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत ५ जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी मध्ये 1. गजानन तुळशीराम इंगळे (वय ४२, रा. गोपाळनगर, खामगाव, जि. बुलढाणा, २. केशव अभ्याजी सरोदे (वय ४५, रा. आकोला नाका, मालेगाव, जि. वाशिम) ३. किशोर वामन कांबळे (वय ५०, रा. सिरपूर जैन, मालेगाव, जि. वाशिम) ४. पवन ओमप्रकाश चौधरी (वय ४२, रा. शिवाजी वेस, खामगाव, जि. बुलढाणा) ५. योगेश पद्माकर भोज (वय २७, रा. जालंब नाका, डीपी रोड, खामगाव, जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या आरोपींनी बायपासवरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडवून लुटमार करण्याचा आणि शहरात घरफोडी करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, आरोपींजवळ ‘भारतीय बच्चों के बँक’ अशा खेळणीच्या नोटा असून, त्या नोटांच्या बंडलावर खऱ्या भारतीय चलनी नोटा लावून नागरिकांची फसवणूक करण्याचा त्यांचा प्लॅन होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढला प्रमाणे
४,००,००० रुपये किमतीची सिल्वर रंगाची Hyundai i20 कार
२ अतिरिक्त नंबर प्लेट (MH 03 BE 7219)
रोख २,५०० रुपये, एक धारदार तलवार, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूडच्या ५ पुड्या आणि दोरी ४८,००० रुपये किमतीचे ८ मोबाईल हँडसेट (Samsung, Oppo, Motorola, Vivo, K-Touch)
’भारतीय बच्चोका बँक’ लिहलेल्या नकली नोटांचे बंडल असा एकूण जप्त मुद्देमाल: ४,५७,५५० रुपये आहे.
सदर प्रकरणाबाबत पोह/१२८७ महेश कवठाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध बीएनएस (BNS) कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कारवाई यशस्वी करण्यासाठी
पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, आणि पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, सचिन भदर्गे, माणिक वाघ, सिध्देश्वर चाटे, नामदेव दुबे, निलपत्रेवार, राम पौळ, माहुरे, महारुद्र सपकाळ व इम्रान यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.


