गंगाखेड,प्रतिनिधी) : पालम तालुक्यातील निसर्गसंपन्न जांभूळबेट पर्यटनस्थळाच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देऊन 185.16 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी बुधवारी (दि. 28 ऑक्टोबर) दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना लेखी निवेदन सादर केले. तसेच केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत जांभूळबेटचा समावेश करून या पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
पालम तालुक्यातील जांभूळबेट हे निसर्गसौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ असून, त्याच्या नियोजनबद्ध विकासातून परिसरात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. योग्य पायाभूत सुविधा, आधुनिक सोयीसुविधा आणि पर्यावरणपूरक नियोजनाच्या माध्यमातून या स्थळाचा विकास झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, अशी भूमिका आमदार गुट्टे यांनी मांडली.
पर्यटन विकास हा केवळ एखाद्या स्थळाचे सुशोभीकरण करण्यापुरता मर्यादित नसून, त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, लघु व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीची संधी मिळणे आणि परिसरातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. जांभूळबेटचा नियोजनबद्ध विकास झाल्यास या भागाची पर्यटन क्षेत्रातील ओळख व्यापक होण्यासह ग्रामीण विकासालाही चालना मिळू शकते, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
जांभूळबेटच्या विकासासाठी निसर्गसंवर्धन, पर्यावरणाचा समतोल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधताना परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे जतन होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे आमदार गुट्टे यांनी अधोरेखित केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पर्यटनस्थळांच्या विकासासह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. जांभूळबेटच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.


