परभणी ( प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज, आर. पी. हॉस्पिटल, परभणी येथे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून दोन दिवसीय मराठवाडा शल्यचिकित्सा परिषद पार पडली.
शल्यचिकित्सा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत उपचारपद्धती आणि वैद्यकीय संशोधनाच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली मराठवाडा प्रादेशिक शल्यचिकित्सा परिषद ‘MARSCON 2026’ परभणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परभणी सर्जिकल सोसायटीच्या वतीने परभणी मेडिकल कॉलेज,आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत २०० हून अधिक शल्यचिकित्सक, २५० हून अधिक डॉक्टर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या २५ रुग्णांवर करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया हे या परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
या दोन दिवसीय परिषदेत आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, नवीन संशोधन आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित औषधनिर्मिती कंपन्या आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
परिषदेत डॉ. अनिल देगावकर, डॉ. राम तिडके, डॉ. नितीन जोशी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. मुख्तादिर अन्सारी, डॉ. मुकेश राठोड, डॉ. पंकज झावर, डॉ. हमीद-उल-करीम, डॉ. कौशल कोंडावार, डॉ. निहार चांडक आणि डॉ. अनघा वारुडकर यांनी वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अजय पुनपाळे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. हरिश्चंद्र वांगे, डॉ. अतुल देशपांडे, डॉ. विजय कदम, डॉ. एकनाथ गबाले आणि डॉ. निखिल चौहान यांनी विविध शैक्षणिक सत्रांत सहभाग घेतला. चर्चासत्रांमध्ये डॉ. नितीन ताठे, डॉ. अश्फिया खान, डॉ. प्रकाश देवडे आणि डॉ. राहुल राठोड यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक (पॅनेलिस्ट) म्हणून योगदान दिले.
परिषदेचे आयोजन परभणी सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. श्रीकृष्ण कातनेश्वरकर यांच्यासह डॉ. भगवान कोरडे, डॉ. गणेश चव्हाण आणि डॉ. हमीद करीम यांनी पुढाकार घेतला.
परिषदेच्या आयोजनासाठी आर.पी. मेडिकल कॉलेजचे संस्थापक तथा आ.डॉ.राहुल पाटील आणि अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांचे सहकार्य लाभले.


