परभणी (प्रतिनिधी ) तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित २५ व्या राष्ट्रीय ज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण आठ पदकांची कमाई केली. यामध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. सेजल तायडे आणि संस्कृती कोद्रे यांनी सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेतील विविध प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कौशल्य, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ६५ किलो वजनगटात सेजल तायडे हिने सुवर्णपदक, तर संस्कृती कोद्रे हिनेही सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदकाच्या यादीत श्रावणी जाधव, समृद्धी गायकवाड आणि शुभ्रा देशमुख यांनी ड्वेल प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. कांस्यपदकांमध्ये ४५ किलो वजनगटात अनुष्का जैन, तर ड्वेल प्रकारात क्षितिज भोसले आणि हर्षदीप खंडारे यांनी पदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आठ पदकांची भर पडली.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र वुशू संघाच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या अनुभवी खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून, तर बंटी राठोड यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. संघ व्यवस्थापक म्हणून पांडुरंग अंभूरे आणि कु. कोमल डोकडे यांनी जबाबदारी सांभाळली.
मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक बंटी राठोड आणि संघ व्यवस्थापकांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, मेहनत आणि सांघिक भावना या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले.
या यशाबद्दल वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग भाजवा, महासचिव सोहेल अहमद व टेक्निकल डायरेक्टर शंभू शेठ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेचे आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक संजय सबनीस, उपसंचालक माणिक पाटील, उदय जोशी, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे यांनीही पदकविजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.
याशिवाय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वुशू संघटकांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे महाराष्ट्रातील वुशू खेळाला नवी ऊर्जा मिळाली असून, ग्रामीण आणि शहरी भागातील नवोदित खेळाडूंनाही या कामगिरीतून प्रेरणा मिळणार आहे. आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू आणखी मोठे यश संपादन करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.


