परभणी,(प्रतिनिधी) : राज्याच्या सात सत्र न्यायालयांना उडून देण्याचे धमकी ईमेल द्वारे देण्यात आली . यातच परभणी सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांसह डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना न्यायालयीन इमारतीतून बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण परिसरात तपासणी सुरू करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी राज्यातील सात सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल पाठविण्यात आला. यामध्ये सातारा, सोलापूर, ठाणे, बीड, रत्नागिरी, परभणी आणि हिंगोली येथील सत्र न्यायालयांचा समावेश आहे. संबंधित न्यायालयांच्या इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आल्याचे समजते.
परभणी न्यायालय प्रशासनाच्या निदर्शनास हा ई-मेल येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर 11.30 वाजता वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने न्यायालय परिसरात दाखल झाले. डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक व नाशक पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन इमारती आणि परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. न्यायालयाचे गेटही बंद करण्यात आले. तसेच येणार्या जाणार्या प्रत्येकावर लक्ष ठेवले जात होते. या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, पावणे चार वाजेपार्यंत तपासणी केल्यानंतर तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, तेव्हा बॉम्बची केवळ अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर कर्मचार्यांना कार्यालयात सोडण्यात आले.


