परभणी / लातूर:: लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर असलेला चंदनाचा अवैध साठा जप्त केला आहे. या कारवाईत ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे ५४० किलो चंदन जप्त करण्यात आले असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छापा कुठे आणि कसा टाकला?
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर चंदनाचा अवैध साठा केला असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे, दिनांक ०३.११.२०२६ रोजी विशेष पथकाने चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे आनंदवाडी येथे चापोली – नायगाव रोड लगत असलेल्या एका शेतात अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित चंदनाचे लाकूड पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेले आढळले. पथकाने येथून एकूण ११,७०,000/- रुपये मूल्याचे ५४० किलो चंदन जप्त केले आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे: 1. नरसिंग रामा बुंदराळे (वय ५० वर्ष, रा. आनंदवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) २. वसंत भानुदास चानकाणे (वय ४० वर्ष, रा. वाढवणा, ता. उदगीर, जि. लातूर) 3. संतोष वैजनाथ चानकाणे (वय ३५ वर्ष, रा. वाढवणा, ता. उदगीर, जि. लातूर) ४. बालाजी भानुदास चानकाणे (वय ४२ वर्ष, रा. वाढवणा, ता. उदगीर, जि. लातूर)
या सर्व आरोपींविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुंन ५९४/2026 कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता आणि कलम ४१, ४२ भारतीय वन अधिनियमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ/प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/गणेश राठोड, पोहेकॉ/संदीप वाघाडे व पोहेकॉ/गजानन डवरे यांनी सहभाग घेऊन पार पाडली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
नागरिकांना ‘खबर’ हेल्पलाइनद्वारे सहकार्य करण्याचे आवाहन
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी, या दृष्टीकोनातून पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावा
ची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनद्वारे पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.


