परभणी (प्रतिनिधी) काही स्वर काळाच्या मर्यादा ओलांडतात, काही गाणी पिढ्यान्पिढ्यांच्या मनात घर करतात, तर काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कलेच्या माध्यमातून अजरामर होतात. अशाच अजरामर स्वरांचा, आठवणींचा आणि संगीताच्या समृद्ध वारशाचा अनोखा अनुभव परभणीकरांना ‘बाबुजी आणि मी’ या विशेष सांगीतिक मैफलीत अनुभवायला मिळाला.
शहर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘स्वरमयी दीपावली २०२६’ या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर सुधीर फडके यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना बाबुजी अर्थात सुधीर फडके यांच्या अवीट संगीतविश्वाची सुरेल सफर घडवली. वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यानात रंगलेल्या या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ गाण्यांचे सादरीकरण नव्हे, तर दोन पिढ्यांमधील संगीताचा समृद्ध वारसा, त्यामागील आठवणी, किस्से आणि मनमोकळ्या संवादाचा अनुभव! बाबुजींच्या अजरामर गीतांचा प्रवास उलगडताना श्रीधर फडके यांनी सांगितलेले किस्से आणि रसिकांशी साधलेला संवाद यामुळे मैफलीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी महापौर सय्यद इकबाल, श्रीधर फडके, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितिन नार्वेकर,अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, उपायुक्त तुकाराम कदम, डॉ. केदार खटींग,रितेश झांबड,सौ. गिरीजा शंकर आजेगावकर,बबलु टाक सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्या उपस्थित झाले.
जुन्या आठवणींना उजाळा देत रसिकांना संगीताच्या सुवर्णकाळात रमविण्याचे कसब त्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. या सुरेल प्रवासात शेफाली कुलकर्णी साकुरीकर आणि आसावरी बोधनकर यांनी आपल्या सुमधुर गायनाने मैफलीत रंग भरला. सुकन्या जोशी यांच्या प्रभावी आणि ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा अधिक खुलला. तबल्यावर तुषार आग्रे, सिंथेसायझरवर सूर्यवंशी, बासरीवर आदित्य गोगटे आणि तालवाद्यांवर निलेश पाठक यांनी समर्थ साथसंगत करत स्वरांच्या मैफलीला समृद्ध केले. कानांना सुरांची तृप्ती, डोळ्यांना कलेची पर्वणी! या मैफलीचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले ते चित्रकलेचा अनोखा आविष्कार! एकीकडे गाण्यांचे सूर रसिकांच्या मनाचा ठाव घेत असताना दुसरीकडे चित्रकार सिद्धार्थ नागठाणकर यांनी आपल्या कुंचल्यातून सुंदर चित्र साकारले. संगीत आणि चित्रकलेचा हा एकाच वेळी अनुभवता येणारा कलाविष्कार रसिकांसाठी अनोखी पर्वणी ठरला. कानांबरोबरच डोळ्यांनाही तृप्त करणारा हा अनुभव मैफलीच्या स्मरणीय क्षणांपैकी एक ठरला.

‘.…… गीतरामायण’साठी पुन्हा परभणीत येण्याची साद!….
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपमहापौर गणेश देशमुख यांनी परभणीकरांच्या वतीने श्रीधर फडके यांच्याकडे आगामी ‘गीतरामायण’ कार्यक्रमासाठी आग्रहाची साद घातली. परभणीकरांना गीतरामायणाचा अवीट आनंद प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. त्यासाठी आपण पुन्हा परभणीत यावे आणि परभणीकरांसाठी गीतरामायणाचा एक सुंदर, देखणा कार्यक्रम आयोजित करू, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
प्रशासनाची सांस्कृतिक जाण…
उपक्रमाचे तीन वर्षांपासून सातत्य!
या सांस्कृतिक सोहळ्याला महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले यांच्यासह डॉ. केदार खटींग, रितेश झांबड, गणेश उर्फ बबलु टाक, सौ. गिरिजा शंकर आजेगावकर, उपायुक्त तुकाराम कदम, अग्नीशामकचे दीपक कानोडे, कर अधिक्षक अल्केश देशमुख, उद्यान व्यवस्थापक मोहम्मद अथर, महापौराचे स्विय सहाय्यक रमेश चव्हाण, उपमहापौरांचे स्विय सहाय्यक उमेश जाधव, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. उपेंद्र दुधगावकर, आबा ढोले, त्र्यंबक वडसकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, राजाभाऊ मोरे, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, कैलास काकडे, नजीर खान, सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले. संयोजक आबा ढोले लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
शुभांगी कुलकर्णी यांनी रांगोळी रेखाटली होती.याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आली.यावेळी मान्यवरांचा यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने मागील तीन वर्षांपासून दिवाळी पहाट आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात आहे. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नामवंत कलाकारांच्या माध्यमातून परभणीकर रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी देण्याचा हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख राजकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्रांती दैठणकर आणि त्र्यंबक वडसकर यांनी केले, तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख राजकुमार जाधव यांनी मानले.


