जिंतूर,( प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा बारागाव पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिली.
वसा येथील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान परिसरात गुरुवारी (दि. 12 नोव्हेंबर) बारागाव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना बोर्डीकर म्हणाले की, सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बारागाव पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी योजनेच्या कामातील अडचणी दूर करून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करावे आणि नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आढावा बैठकीस जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवराव कराळे, बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्माराम पवार, पंचायत समिती सभापती किशोर खिस्ते, उपसभापती माधवराव दराडे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, पंचायत समिती सदस्य जाधव, बालाजी सांगळे, राजेंद्र नागरे, रवी भोगावकर, विस्तार अधिकारी जाधव यांच्यासह कार्यकारी अभियंता रेवनस्वामी, उपअभियंता राऊत, कनिष्ठ अभियंता नंदकुमार आष्टीकर, उपअभियंता वाहेत आदी उपस्थित होते.
बैठकीत बारागाव पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेशी संबंधित अधिकारी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पाणीपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
सिद्धेश्वर धरणाची अधिकार्यांकडून पाहणी…
बैठकीपूर्वी सिद्धेश्वर धरणाच्या सद्यस्थितीची जिंतूर पंचायत समितीचे सभापती किशोर खिस्ते, उपसभापती माधवराव दराडे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता निवडुंगे, उपअभियंता शिरसाट, कोकडवार, हिंगोली येथील अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. धरणातील पाणीसाठा आणि पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली.


