कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक वंचित घटकापर्यंत प्रशासनाने पोहोचवावा– पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, (प्रतिनिधी) – भटके-विमुक्त समाजातील उपेक्षित व वंचित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. परभणी जिल्ह्यातील अशा नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवून त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून प्राधान्याने कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्यमंत्री यांचे सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भटके विमुक्त विकास राज्य परिषद आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भटके-विमुक्त प्रमाणपत्र व योजना विशेष अभियानाच्या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कैलास अंडील, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. तेजस माळवदकर, सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे, नगरसेवक तथा अभियानाचे अशासकीय सदस्य डॉ. केदार खटिंग, ऋषीकेश सकनुर, लक्ष्मण सोनवणे, हनुमानसिंग कच्छवे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भटके-विमुक्त प्रमाणपत्र व योजना विशेष अभियान राबविण्यात येत आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या जिल्हयातील या घटकातील लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये म्हणून अधिकाऱ्यांनी काळजीपूर्व सर्वेक्षण करावे. यासाठी आठवड्यातील एक दिवस ठरवून भटके-विमुक्त समाजातील उपेक्षित व वंचित नागरिकांच्या वस्ती किंवा पालावर जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. या कामाकरीता अभियानाच्या अशासकीय सदस्यांचे सहकार्य घ्यावे, त्यानुसार निश्चित कार्यप्रणाली बनावावी. त्यांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित शिबीरांचा आराखडा तयार करुन त्याची जनजागृती करावी, जेणेकरुन कुणीही लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच दुष्काळ परिस्थितीत भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसू नये म्हणून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असेही पालकमंत्री यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या घटकातील एकही नागरिक शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी अभियानातील अशासकीय सदस्यांच्या समन्वयाने एका आठवड्यात तालुकास्तरीय कृती आराखडा तयार करावा. त्यानुसार जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येईल. तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून भटके-विमुक्त समाजातील वंचित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कोणताही पात्र नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. तसेच त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील.
विशेष कार्य अधिकारी कैलास अंडील यांनी भटके-विमुक्त प्रमाणपत्र व योजना विशेष अभियानाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध विभागांची जबाबदारी तसेच अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती विशद केली. भटके-विमुक्त समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व इतर आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून देणे, त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि या घटकातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या दृष्टीने अभियानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती खांडेकर यांनी भटके-विमुक्त प्रमाणपत्र व योजना विशेष अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून अभियान यशस्वी करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी अशासकीय सदस्य लक्ष्मण सोनवणे, ऋषीकेश सकनुर, डॉ. केदार खटिंग व हनुमानसिंग कच्छवे यांनी
अभियानाच्या अनुषंगाने प्राथमिक स्वरूपात आपली मते व सूचना मांडल्या. तसेच भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली.
अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या सूचना व समस्यांची पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सकारात्मक दखल घेतली. भटके-विमुक्त समाजाच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी,असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन आर. एस. साळेगावकर यांनी केले.
***


