परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने परभणी पोलीस दलाकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दिनांक १७/११/२०२६ रोजी पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे सुपा, तांडा येथील वामन भाऊराव राठोड यांच्या शेतात छापा टाकण्यात आला. सदर कारवाईदरम्यान गांजा या अंमली पदार्थाची हिरवी पाने असलेली, मुळांसह उपटलेली व वाळविण्यासाठी ठेवलेली एकूण २६ किलो वजनाची २६ लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत रु. १३,००,०००/- (तेरा लाख रुपये)इतकी आहे.
सदर कारवाई पोलीस अंमलदार शिवदास धुळगुंडे व पोलीस अंमलदार अविनाश बोरगीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवदास धुळगुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी वामन भाऊराव राठोड याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पिंपळदरी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६, कलम ८(ब), २०(अ) एनडीपीएस ॲक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आंदोरीकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. तानाजी चिखले व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एपीआय श्रीमती दिपाली गीते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आंदोरीकर, पोलीस अंमलदार *शिवदास धुळगुंडे, गोविंद मुरकुटे*, पोलीस शिपाई अविनाश बोरगीर, सचिन भदाडे, बनाटे व मकलेलू यांनी सक्रिय सहभाग घेतला.
परभणी जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक, विक्री व वितरण करणाऱ्यांविरुद्ध परभणी पोलीस दलाकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असून, अशा अवैध प्रकारांची माहिती नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहन परभणी पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.


