परभणी, (प्रतिनिधी): सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मुलीच्या विवाहासाठी आर्थिक आधार मिळावा, तसेच विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अनावश्यक खर्च कमी करून सामाजिक समतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ‘कन्यादान योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
विवाह समारंभामध्ये आर्थिक परिस्थितीचा विचार न करता अनेकदा अनावश्यक खर्च केला जातो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर विवाहाचा अतिरिक्त आर्थिक भार पडतो. अशा कुटुंबांना दिलासा मिळावा, विवाह प्रक्रियेत साधेपणा व सामाजिक बांधिलकी जपली जावी आणि सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणता यावे, यासाठी शासन कन्यादान योजना राबवित आहे.
सामूहिक विवाह सोहळे हे सामाजिक एकोपा, समता आणि साधेपणाचे प्रतीक ठरू शकतात. या सोहळ्यांच्या आयोजनामुळे विवाह खर्चात बचत होऊन गरजू कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी या योजनेच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे आणि योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
कन्यादान योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, परभणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कारेगाव रोड, जायकवाडी वसाहत, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*-*-*-*-*


