नवजात बालकांचे आरोग्य, सुरक्षित संगोपन आणि निरोगी भविष्य सुनिश्चित करण्यावर भर
गंगाखेड, (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस व बालरोगतज्ज्ञ डॉ. केशव मुंडे यांनी राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह कार्यक्रमात नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षित संगोपन आणि आवश्यक आरोग्यसेवांबाबत मार्गदर्शन केले.
नवजात बालकांच्या आयुष्यातील पहिले २८ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या कालावधीत बालकांचे आरोग्य, पोषण आणि विकास याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच विशेष नवजात शिशु काळजी कक्षातून (SNCU) उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेली बालके यांचा नियमित आरोग्यविषयक पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.
*‘बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’* ही यावर्षीच्या राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाची संकल्पना असून, नवजात बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.
सप्ताहानिमित्त तालुक्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये मातांना बाळाच्या जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व, पहिले सहा महिने केवळ स्तनपान, कांगारू मदर केअर (KMC), योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी, वेळेवर लसीकरण, स्वच्छता तसेच बालकाची वाढ व विकास यांचे निरीक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तसेच SNCU, NICU व NBSU यांसारख्या विशेष नवजात शिशु उपचार कक्षांतून घरी सोडण्यात आलेल्या बालकांचा नियमित पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येत आहे. आशा सेविका, एएनएम व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या माध्यमातून जोखमीच्या बालकांना गृहभेटी देऊन आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नवजात बालक दूध न पिणे, तापमान असामान्य होणे, असामान्य सुस्ती, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा झटके येणे यांसारखी धोक्याची लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचारासाठी घेऊन जाणे आवश्यक आहे.
तालुक्यातील सर्व माता-पित्यांनी नवजात बालकांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, पहिले सहा महिने केवळ स्तनपान द्यावे, बालकाचे लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण करावे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटी व पाठपुरावा सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस व बालरोगतज्ज्ञ डॉ. केशव मुंडे यांनी केले. यावेळी नागरिक बालके ,पालक आरोग्य कर्मचारी व स्टाफ उपस्थित होते.


